रेणापूर : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविली असून, रेणा मध्यम प्रकल्पासह, छोट्या-मोठ्या पाझर तलावातील पाणीसाठ्यात किंचत ही वाढ झालेली नाही. उलट पाणीसाठा कमी होत असून, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रेणा प्रकल्पात केवळ २४ टक्केच पाणीसाठा आहे. तर शेतशिवारातील पिके सुकून चालली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रेणापूर तालुक्यामध्ये रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी करण्यात आली. अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर आता पिके माना टाकून सुकू लागली आहेत. शेतकरी पावसाची देवासारखी वाट पाहत असून, उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी रेणापूर तालुक्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तब्बल १४ वेळेस पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. तसेच बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली होती. मात्र, यंदा जुनपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मागील वर्षी १४ वेळेस पाण्याचा विसर्ग...रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर शहरासह तालुक्यातील ५० टक्के गावांना आणि अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे १४ वेळेस पाण्याचा विसर्ग करावा लागला. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला असला तरी प्रकल्पात २४ टक्केच पाणीसाठा आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होणे शक्य नाही.
प्रकल्पात ५.०३२ दलघमी जिवंत पाणीसाठा...सध्या रेणा मध्यम प्रकल्पात जिवंत साठा ५.०३२ दलघमी, मृतसाठा १.१३४ दलघमी असे एकूण ६.१६२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, यंदा तालुक्यात व धरण क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्याने प्रकल्पात एकही टक्का पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे आहे त्याच पाण्यावर तहान भागवली जात आहे. अशीच स्थिती राहिली तर रेणापूर शहरासह व अंबाजोगाई तालुक्यातील या पाण्यावर अवलंबून असलेल्या लोकांना टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा...सध्या रेणा मध्यम प्रकल्पात ६.१३२ दलघमी म्हणजेच २४.४७ टक्के जलसाठा आहे. यंदा धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ झालेली नाही. आगामी काळातील पावसावरच पुढील गणित अवलंबून आहे. मध्यम प्रकल्पातून ज्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी भविष्याचा विचार करावा. काटकसरीने पाण्याचा वापर करुन येणारी पाणीटंचाई टाळावे असे आवाहन रेना मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.