- गोविंद इंगळेनिलंगा (जि. लातूर) : बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंगा केंद्र असलेले जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथील केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा मंगळवारी होती, असे सांगितले असता या परीक्षार्थींचा गाेंधळच उडाला. दरम्यान, केंद्र प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा घेत असलेल्या कंपनीस तात्काळ माहिती दिली. कंपनीने निलंग्याऐवजी लातूर आणि आलमला येथील केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे सांगितल्याने या विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडाली.
बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयाचे केंद्र आहे. त्यामुळे या केंद्रावर जिल्ह्यातून तसेच नांदेड जिल्ह्यातून जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी परीक्षेसाठी आले होते. केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा २५ एप्रिल रोजी होती असे ऑनलाईवर होते असे सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट दाखवून २६ रोजी परीक्षा असल्याचे म्हणाले. मात्र, केंद्रप्रमुखांनी परीक्षेस बसता येणार नाही, असे म्हणाल्याने गोंधळ उडाला. तेव्हा विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. निवेदनावर रोहिणी देशमुख, जान्हवी ढगे, दिगंबर गायकवाड, शाहिस्ता बेगम करीम बागवान, गजानन सोळुंके, वर्षाताई आडे, शितल गोरे, चैताली मंगनाळे, राजनंदिनी मोरे, सतीश मद्देवार, गिरीधर पंदीलवाड, लक्ष्मण पंदीलवाड, दीपक सोनकांबळे, आशुतोष जाधव, संदीप जाधव, शुभम पांचाळ, माधव बर्डे, चंद्रशेखर क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर यांच्यासह जवळपास १२५ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
परीक्षार्थी झाले आक्रमक...या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा केंद्राकडे माेर्चा वळवित केंद्रप्रमुख आणि प्राचार्य एम. एन. कोलपुके यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी परीक्षार्थींची यादी तयार करुन परीक्षा घेण्याऱ्या संबंधित कंपनीस पाठविले. कंपनीने सदरील परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे सांगितले. तेव्हा आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ये- जा करण्यासाठी झालेला खर्च द्यावा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. अखेर कंपनीने विद्यार्थ्यांना परीक्षा आजच होती. मात्र, त्यासाठी लातूर व आलमला येथील केंद्रावर दोन तासांत पोहचण्यास सांगितले. तसेच परीक्षार्थींचा निलंग्याहून जाण्याचा प्रवास खर्च कंपनी करणार असेही सांगितले. तेव्हा परीक्षार्थींनी आलमला व लातूरकडे धाव घेतली.
परीक्षेसाठी सतत त्रास...परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्या ऐनवेळी असाच गोंधळ घालतात. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्नही परीक्षार्थींनी केला.