लातूर - उदगीर आगारातून शनिवारी सकाळी लातूर व निलंगा मार्गावरील बसेस सुरू केलेल्या असताना व कर्नाटक व तेलंगणा राज्यातील बसेस उदगीर आगारात आल्या हाेत्या. यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालून शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणला व जीवे मारण्याची धमकीही दिल्या प्रकरणी २४ कर्मचाऱ्यांविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर व विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व उदगीर आगाराचे आगार प्रमुख यशवंत कानतोंडे,वाहतूक नियंत्रक अनिल पळनाटे यांनी शनिवारी सकाळी आगार परिसरात थांबून लातूर व निलंगा मार्गावर बसेस सुरू केल्या होत्या. शिवाय कर्नाटक व तेलंगणा राज्यातील उदगीर शहराबाहेर वळण रस्त्यावर थांबणाऱ्या बसेस उदगीर आगारात आणण्यात आल्या होत्या. यावेळी उदगीर-लातूर जाणाऱ्या बसच्या चालक व वाहकास शिवीगाळ करून गोंधळ घालून पूर्ववत सुरू झालेल्या बसेस काही कर्मचाऱ्यांनी बंद करण्यास भाग पाडले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी आगार प्रमुख यशवंत कानतोंडे यांनी उदगीर शहर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारनंतर एकही बस धावली नाही...उदगीर येथून लातूर मार्गावर पाच फेऱ्या व निलंगा मार्गावर एक फेरी सोडण्यात आली होती. दुपारी तीन नंतर आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. शिवाय कर्नाटक व तेलंगणा राज्यातील बसेसनाही मनाई करण्यात आल्यामुळे त्या बसेस पूर्ववत वळण रस्त्यावर थांबत असल्याचे सांगण्यात आले.