-हरी मोकाशेतूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत भाजपकडे तीन तर काँग्रेसकडे तीन आमदार असे पक्षीय बलाबल आहे. मात्र केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत लातूर मनपा आणि जिल्हा परिषद भाजपने ताब्यात घेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत लातूर भाजपचा गड असल्याचे सांगितले. आता विधानसभेच्या रिंगणात पुन्हा बालेकिल्ला उभा राहतो की गड टिकतो, याकडे लक्ष लागले आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधील बंडाळी चर्चेचा विषय आहे. आ. विनायकराव पाटील अपक्ष निवडून आले होते. ते सध्या भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांचे कडवे आव्हान आहे. त्यातच भाजप बंडखोर दिलीपराव देशमुख अपक्ष उभे आहेत. तर भाजपतील प्रबळ दावेदार अयोध्याताई केंद्रे वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार आहे.उदगीरमध्ये विद्यमान आ. सुधाकर भालेरावांना तिकीट न देता भाजपने नवखा उमेदवार दिला. ऐनवेळी झालेला बदल राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे आपल्या बाजूने कसा करतात, यावर निकाल असेल. एकंदर, भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांना कमी वेळेत मोठ्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने चित्रच बदलले आहे. पाच वर्षे तयारीत राहिलेल्या भाजपा इच्छुक रमेश कराड यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे काँग्रेसचे धीरज देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेनेचे सचिन देशमुख असा सामना होईल. एकीकडे साखर कारखान्यांमुळे काँग्रेसचे गावनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे, तर दुसरीकडे नवखा उमेदवार यामुळे कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
रंगतदार लढती
लातूर शहर मतदारसंघातून आ. अमित देशमुख मोदी लाटेतही टिकून होते. आता ते तिसऱ्यांदा मैदानात आहेत. भाजपाने पुन्हा शैलेश लाहोटींना रिंगणात आणले. सोबतीला वंचित बहुजन आघाडीही आहे. गेल्या १५ दिवसांत आ. देशमुख यांनी शहराचा कानाकोपरा पिंजून काढत मनपात सत्ता मिळविलेल्या भाजपाला आव्हान दिले आहे.निलंगा मतदारसंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध त्यांचे काका काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर असा सामना रंगत आहे. पालकमंत्र्यांनी विकास कामांद्वारे मतदारसंघाची बांधणी पक्की केली आहे.औश्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील विरुद्ध मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार हे भाजपकडून उभे आहेत. दोन्ही बाजूंनी विकासाचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मतदारसंघात गावोगाव संपर्क असणारे बसवराज पाटील आणि नव्याने मैदानात उतरलेले पवार हा सामना अटीतटीचा असणार आहे.