औसा - काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला. लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरविण्यात आली होती. यावर पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत तेच पाकिस्तानला हवं आहे. जम्मू काश्मीरमधून सैन्यांचा अधिकार काढून टाकणार तेच पाकिस्तानला हवं आहे. पाकिस्तानला जे जे हवं तेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. जे देशाच्या विरोधात बोलतील त्यांच्याविरोधात असणारं देशद्रोहाचं कलमही काँग्रेस रद्द करण्याचं आश्वासन देते. पाकिस्तानला पुरक भूमिका घेण्याचं काम काँग्रेसकडून होते. दहशतवाद्यांशी मानवता दाखविणाऱ्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली.
तसेच घराणेशाहीवर टीका करतानाही बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बाळासाहेबांना वाटलं असतं तर बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, जर बाळासाहेबांना वाटलं असतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र बाळासाहेबांनी लोकांसाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांनी घराणेशाहीचा मार्ग अवलंबला नाही असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
...म्हणून बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढला होता द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदान करणे आणि निवडणूक लढवणे यावर बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 मध्ये बाळासाहेबांवर 6 वर्षासाठी मतदान करण्यावर बंदी आणली होती. यानंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता.