अहमदपूर (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील वीरमठ संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी सलग १७व्या लोकसभेसाठीही मतदान केले आहे़ १९५२ पासून त्यांनी एकाही लोकसभा निवडणुकीचे मतदान चुकविले नाही़
डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात यांचा मोठा भक्तवर्ग आहे़ त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला़ त्यांनी १९४५ मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोर विद्यापीठातून एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी घेतली़ स्वातंत्र्य संग्रामातही त्यांचे योगदान होते़ आध्यात्मिक गुरू असलेले डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक चळवळी व प्रवचनांमधून समाज प्रबोधनासाठी आयुष्य दिले़
१९५२ साली पंजाब प्रांतात त्यांचे वास्तव्य होते़ तेथेच त्यांनी पहिले मतदान केले़ त्यावेळी दोन उमेदवार रिंगणात असत़ दळणवळणाची साधनेही अपुरी असल्याने निवडणुकीचा प्रचार मर्यादित होई़ परिणामी उमेदवारांची भेटही होत नसे, अशी माहिती देत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, त्यावेळेही दोन ठिकाणी शाई लावण्याची पद्धत होती़ मतदार याद्या हाताने लिहिलेल्या असत़ मतपत्रिका मात्र छापील असे़ पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या सर्वच नेत्यांच्या काळातील निवडणुका आणि आठवणीही त्यांनी सांगितल्या़ अलीकडच्या निवडणुकांचे अनेक संदर्भ त्यांच्या स्मरणात आहेत़
निवडणूक हा सरकार निवडून देण्याबरोबरच समाज आणि देशाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचा घटनात्मक मार्ग आहे़ हे आयुध प्रत्येक नागरिकाने वापरले पाहिजे़ - डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज