लातूर : शहरातील सर्वच भागात आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारपासून हा प्रयोग सुरू झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार पुरवठा करण्यात येत आहे. किमान दीड तास पाणी दिले जाईल. त्यानंतर बंद करून दुसऱ्या भागात पाणी देण्याचा निर्णय आहे.
तीन दिवस झाले तक्रारी आलेल्या नाहीत. बहुधा हा प्रयोग यशस्वी होईल, अशी अपेक्षा पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. पाइपलाइनला गळती असल्याने जास्त वेळ पाणी सोडावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी शहरात विविध ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकली आहे. तसेच ७५० क्रॉस कनेक्शन व १५०पेक्षा अधिक व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ही कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गढूळ, पिवळ्या पाण्यामुळे त्रस्त लातूरकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. चार दिवसाला दीड तास पाणी दिले जाईल. दीड तासात मिळालेले पाणी चार दिवस पुरेल. नागरिकांनी काटकसरीने वापर करावा व पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी केले आहे.
चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक...चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, या वेळापत्रकानुसार संपूर्ण शहरात प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नियमित केले जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी सांगितले.