प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. डॉ. रमेश पारवे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णाभाऊ यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार सशक्त आणि समृद्ध केले. तमाशा या लाेककलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीत, पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. १९४४ ला त्यांनी ‘लाल बावटा’ पथक स्थापन केले. ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली...’ ही त्यांची गाजलेली छक्कड होती. अण्णाभाऊनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले. पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्र प्रमुखाकडून त्यांचा सन्मानही झाला. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केले आहे असेही ते म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. रमेश पारवे, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. नितीन डोके, डॉ. अशोक वाघमारे, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. भुरे, नवनाथ भालेराव, लखन सुरवसे, प्रमोद मुगळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.