शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन
By संदीप शिंदे | Published: August 28, 2024 07:49 PM2024-08-28T19:49:19+5:302024-08-28T19:51:01+5:30
मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो: अजित पवार
अहमदपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनतेची माफी मागितली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो, अशी भावना त्यांनी बुधवारी व्यक्त केली.
अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे तर मंचावर क्रीडामंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, सूरज चव्हाण, ॲड. व्यंकट बेद्रे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व जातिधर्माच्या लाेकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेने पक्षाची वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये काम करीत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. विरोधक यावर दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. याकडे जनतेने दुर्लक्ष करावे, सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी...
अहमदपूर येथील जिजाऊ फंक्शन हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा सभागृहाच्या समोर देण्यात आल्या. आरक्षण आमच्या हक्काचे असून ते मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी सुरू असताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री पवार हे कार्यक्रम संपवून बाहेर जातानाही पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी तरुणांनी घोषणाबाजी केली.