लातूर : शहराजनिकच्या केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाच्या रंगरुट प्रशिक्षण केंद्रात बुधवारी ३९७ जवानांचा दीक्षांत व शपथ ग्रहण सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी मध्यप्रदेशातील निमच सीटीसीच्या केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाचे पोलिस महानिरीक्षक संदीप दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूरच्या रंगरुट प्रशिक्षण केंद्राचे पोलिस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य संजीव कुमार, मुख्य प्रशिक्षण अधिकारी धैर्यपाल सिंह, परेड कमांण्डर विशाल कोरे यांच्यासह केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि विविध कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.
सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पोलिस महानिरीक्षक संदीप दत्ता यांनी २८ व्या बॅचचे सर्व प्रशिक्षक, जवान व त्यांचे कुटुंबिय यांना शुभेच्छा दिल्या. हे जवान आपले कर्तव्य व देशसेवेचे प्रामाणिकपणे कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
४४ आठवड्यांचे कठीण प्रशिक्षण...छत्तीसगड राज्यातून निवडलेल्या एका महिलेसह ३९७ जवानांनी ४४ आठवड्यांचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षित जवान स्वत:ला देशसेवेकरिता समर्पित करण्यासाठी तयार झाले आहेत. या जवानांनी नक्षलवाद, आंतकवादांचा सामना करण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच विविध प्रकारचे शस्त्र चालविण्याचा अभ्यास पूर्ण केला आहे. जवानांनी विधी विषयक ज्ञान, जीवन रक्षक व व्यवसायिक कौशल्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आतापर्यंत लातूरच्या प्रशिक्षण केंद्रातून २८ बॅचच्या माध्यमातून ७ हजार ९९३ जवानांनी प्रशिक्षण घेतले आहे.
सर्वोत्कृष्ट जवानांचा गौरव...या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट जवानांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी आणि रँक देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिपाई राकेश हेमला यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. सोहळ्यादरम्यान प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी जवानांनी विविध चित्तथरारक कसरती सादर केल्या.