लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून दवाखान्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाह्यरुग्ण सेवा बंद केली असली तरी फोन, व्हॉट्सअपवर सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांना आरोग्य सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे, शिवाय रुग्णांची समस्या दूर होत आहे.
वातावरणातील बदलामुळे बालकांत सर्दी, ताप, खोकला असे आजार दिसून येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये भीती पसरत आहे. त्यामुळे बालकांवर उपचारासाठी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे नोंदणी करण्यासाठी धडपड सुरू आहे. नोंदणीसाठी फोन केला असता ओपीडी बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालक आणखीन धास्तवत आहेत. तेव्हा खाजगी दवाखान्यातील कर्मचारी डॉक्टरांच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करण्यास सांगत आहेत. डॉक्टरांशी संपर्क साधत आजारासंदर्भात माहिती दिल्यास कोणती औषधें घ्यायची त्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पालकांतुन समाधान व्यक्त होत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधांची माहिती....लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सर्दी, ताप, खोकला अशा रुग्णांसाठी विशेष तपासणी कक्ष सुरू करण्यात आला असला तरी संचारबंदीमुळे आटोरिक्षा बंद आहेत. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत खाजगी डॉक्टरांचा आरोग्य सल्ला महत्वाचा ठरत आहे.