शिरूर अनंतपाळ : शहराबरोबरच आता कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही झपाट्याने वाढला आहे. सध्या तालुक्यात २९९ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पाच गावांतच १९९ रुग्ण आढळले आहेत.
दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येऊन नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध कारणे सांगून काहीजण रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ४८ पैकी ४२ गावांत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे.
तालुक्यातील पाच गावांत सर्वांत जास्त रुग्ण असून, यामध्ये शिवपूर येथे ६३, तळेगाव (दे.) येथे ५३, डोंगरगावात २८, साकोळमध्ये २७, उजेड येथे २३ कोरोना बाधित आहेत.
गृहविलगीकरणावर विशेष लक्ष...
तालुक्यातील २६० कोरोना बाधित हे गृह विलगीकरणात आहेत. ते घराबाहेर पडतात की नाही, याची पडताळणी करण्यासाठी, तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गृह विलगीकरणातील बाधितांची दररोज माहिती घेतली जात आहे.
तालुक्यात ३९ कंटेन्मेंट झोन...
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या आढळून येत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून रुग्ण संख्या अधिक असलेल्या गावांत ३९ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. तिथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
- अतुल जटाळे, तहसीलदार.
चौकट...
एकूण बाधित : ५२५
उपचारानंतर बरे : २२१
ॲक्टिव्ह रुग्ण : २९९
मयत : ०५
होम आयसोलेशन : २६०
कोविड केअर सेंटर : ३०