लातूर - कोरोना या महाभयंकर साथ आजाराला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. या संचारबंदीमुळे गोरगरीबांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावत आहेत. लातूर शहरातील बेवारस आणि गोरगरीबांना अन्नाचा घास या संस्था भरवत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठान, रूद्र प्रतिष्ठान आणि राहूल पाटील मित्र मंडळाचे पदाधिकरी या गोरगरीबांना जेवण पुरवत आहेत.
वसुंधरा प्रतिष्ठान, रूद्र प्रतिष्ठान आणि राहूल पाटील मित्र मंडळाने माणुसकीचा धर्म वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनामुळे सर्व हॉटेल्स बंद आहेत. अनेकजण लातूर शहरात भिक्षा मागून आपल्या पोटाची खळगी भरतात. अनेकांना कामही नाही, त्यामुळे खायचे काय हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा आहे. अशात लातूर शहरातील या स्वयंसेवी संस्था अन्न पुरवठा करण्याचे कार्य करीत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठान जमेल तितक्या लोकांना अल्पोपहार आणि अन्नदान करीत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य प्रशांत स्वामी, शीतल मगर, अभिजीत स्वामी यांनी सहभाग नोंदवत शहरभर फिरून अन्नदान केले.
रूद्र प्रतिष्ठानचे सुमीत दीक्षीत, प्रशांत एवरीकर तसेच राहूल पाटील मित्रमंडळाचे राहूल पाटील, अकाश गायकवाड, प्रविण येळे, मुस्ताफा सय्यद आदी कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीतून लातूर शहरात हा उपक्रम राबवित आहेत. या संस्थांनी गुरूवारी शहरातील मध्वर्ती बसस्थानक, गंजगोलाई, सम्राट चौक तसेच शहरातील अन्य भागात खिचडी, पोहे, सुशीला आदी खाद्यपदार्थांचे पाकीट करून वाटप केले.