औसा : कोरोनाची दुसरी लाट औसा तालुक्यात वेगाने पसरत आहे. त्यामुळे तालुक्यातील १४९ पैकी १३२ गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण किल्लारी, उजनी, नागरसोगा, आलमला, होळी या गावात आढळून आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच बाधित आढळल्यास त्याच्या अति जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोविड चाचणी केली जात आहे. गृहविलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडू नयेत म्हणून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. तसेच गावागावात जनजागृती करण्यात येऊन कोविड लसीकरणावर भर देण्यात आला आहे.
कोविड रुग्ण आढळलेले घरावर बॅनर लावण्यात येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा. अनावश्यक घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविड चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. चहा हॉटेल, पानटपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जात आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी...
औसा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोविड चाचणी केली जात आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारपासून निर्बंध अधिकच कडक करण्यात येणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
- शोभा पुजारी, तहसीलदार.
चौकट...
एकूण बाधित : ३६७१
उपचारानंतर बरे : २७२१
ॲक्टिव्ह रुग्ण : ८७१
मयत : ७९
होम आयसोलेशन : ४९४
कोविड केअर सेंटर : १२८