लातूर : कोरोनाचा संसर्ग (Corona Virus ) झपाट्याने सुरू असून, तब्बल २५ दिवसांनंतर लातूर जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी १६६५ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये एकूण ४७५ रुग्ण आढळले, तर प्रकृती ठणठणीत होऊन ४९५ जण घरी परतले, ही बाब दिलासादायक असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार ३२८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ३८९९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये ४२९ रुग्णांचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ४५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २०६ पॉझिटिव्ह आढळले असून, १२१४ व्यक्तींची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात २६९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन्ही मिळून १६६५ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४७५ नवे रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २८.५ टक्के आहे. दरम्यान, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यात चाकूर तालुक्यातील एक आणि इतर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी १६ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. चौघांना व्हेंटिलेटर आहे. १९ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर आहेत, तर ६० रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु विनाऑक्सिजनवर आहेत, तर ४२४५ जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सुटी झालेल्या ४९४ रुग्णांपैकी ४४३ रुग्ण होम आयसोलेशनमधील आहेत. उर्वरित ३७ रुग्ण दवाखाना व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.