लातूर : कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथ आजाराला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. यात हातावरचं पोट असणाऱ्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत, म्हणून लातूर जिल्हा प्रशासनाने शिधापत्रिका नसणाऱ्या गरुजूनाही धान्य देण्याचे नियोजन केले आहे. प्रशासनाच्या वतीने गरजुना स्वस्त धान्य दुकानातून गहू,तांदूळ आणि डाळ दिली जाणार आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ज्या गरजूंकडे शिधापत्रिका नाही, त्यांनाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल पासून होणार आहे. या अनुषंगाने ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही,त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात नगरसेवकांचे सहकार्य घेऊन यादी तयार केली जाईल. शिवाय,ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांची नोंद करून घेतली जाईल आणि रेशन धान्य दुकानातून गहू ,तांदूळ आणि डाळ देण्यात येईल असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.
ईदगाह मैदानावर सोशल डिस्टेंस नुसार भाजी मार्केट...लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सोशल डिस्टेंस नुसार तात्पुरते भाजी मार्केट तयार करण्यात आले आहे. दयानंद गेट समोरील रयतु बाजारांमधील भाजी विक्रेत्यांना ईदगाह मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात भाजी विक्रीसाठी जागा देण्यात आली असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.