लातूर : विलासरावराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात शुक्रवारी ५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर अन्य दोन रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत ५० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ५४३ रुग्ण तपासले आहेत. त्यापैकी ५० रग्णांच्या घश्यातील स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४३ व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ७ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे ७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील ५ जण शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आहेत. तर दोघे खासगी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल आहेत. दरम्यान ९ रुग्णांचा विलगीकरण कक्षातील कालावधी संपला आहे. ३६ व्यक्ती जिल्हा आरोग्य विभागाच्या जिल्हा कोरोना निगराणी समितीच्या देखरेखीखाली आहेत. म्हणजे होम क्वारंटाइनमध्ये आहेत, माहिती शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉक्टर मारुती कराळे यांनी दिली.
रुग्णालयातील अनावश्यक गर्दी टाळा : अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूरपरदेशात प्रवास केल्याची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांची शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुण्या-मुंबईहून आलेल्या रुग्णांची तपासणी होत आहे. त्यामुळे रूग्णालयात होणारी गर्दी लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात तपासणीची सोय करण्यात आली आहे. रुग्णांनी लातूरच्या दवाखान्यात गर्दी करण्यापेक्षा नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.