- हणमंत गायकवाड
लातूर : कोरोनाच्या (corona virus in Latur) ) दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्ण नातेवाइकांची गैरसोय झाली. ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली. आता लातूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाला असून, सद्य:स्थितीत हवेतून ८.०४ मे. टन ऑक्सिजन तयार होत आहे. ४.२८ कोटी रुपये खर्च करून सात प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित झाले आहेत. (Latur district self-sufficient in oxygen)
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हवेतून ३.७४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार झाला असून, शहरातीलच स्त्री रुग्णालयात ०.३७ मेट्रिक टनाचा प्रकल्पही सुरू झाला आहे. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात १.३० लाख रुपये खर्च करून १.१२ मेट्रिक टन निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला आहे. तसेच निलंगा उपजिल्हा रुग्णालयातही १.१२ मे. टन क्षमतेचा हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आहे. ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे ०.१९ मे. टन, औसा ग्रामीण रुग्णालयात ०.५६ मे. टन, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात ०.९४ मे. टन ऑक्सिजन निर्मतीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. स्त्री रुग्णालय आणि व्हीडीजीआयएमएस या दोन संस्था वगळता अन्य पाच संस्थांच्या उभारणीसाठी ४२८ लाख रुपये खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.
पाच प्रकल्प प्रस्तावितएकूण ०.४५ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे पाच प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहेत. देवणी, चाकूर, रेणापूर, जळकोट आणि किल्लारी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ०.९ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे. लवकरच या आरोग्य संस्थांमध्येही हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे हे प्रकल्प कार्यान्वित होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी सांगितले.