लातूर: कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लातूर मनपानेही कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, विविध उपाययोजना आखल्या आहेत. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करण्यासाठी दीडशे दुकानदारांना परवाने दिले आहेत.
भाजीपाला, फळ, किराणा, मेडिकल आदी दुकानांतील जीवनावश्यक वस्तू फोन केल्यानंतर घरपोच मिळतील. त्यासाठी विक्रते तयार झाले असून त्यांचे फोन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय विक्रेत्यांना परवाना देण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला साहित्यासह ग्राहकांना मटन, अंडी, चिकन आदी आहारही होम डिलिव्हरीतून मागविता येईल. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरची गर्दी आणखीन कमी होणार आहे. लातूर जिल्ह्यात कोरोना रूग्ण नसले तरी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सर्दी, ताप, खोकला, डोके दुखी असलेल्या रूग्णांसह पुणे व मुंबई येथून आलेल्या नातेवाईकांच्या नोंदी महानगरपालिकेच्या पथकाने केल्या आहेत. शिवाय, मनपाच्या नागरी दवाखान्यातील कर्मचाºयांमार्फतही सर्दी, ताप आणि डोके दुखी असलेल्या रूग्णांचा सर्व्हे करण्यात येत आहे.
नागरिकांंनी रस्त्यावर गर्दी करू नये: महापौरशहरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाºया दीडशे विक्रेत्यांना प्रभागनिहाय होम डिलिव्हरी करण्यासाठी परवाानगी देण्यात आली आहे. त्यांच्यकडे नागरिकांना आवश्यक त्या वस्तूंची मागणी करता येईल. या सर्व विक्रेत्यांना माफक दर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.