लातूर : लातूर येथील शासकीय रुग्णालयात गेल्या ११ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यात लातूर शहरातील संभाजी नगरातील २, रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील २ आणि औसा शहरातील कादरीनगर व हिप्परगा येथील प्रत्येकी १ अशा एकूण ६ रुग्णांचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील एक ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होता. सदर रुग्णास हृदयविकार तसेच रक्तदाबाचा त्रास होता. तसेच कोरोनामुळे न्यूमोनियाही झाला होता. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान सदर रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा चौथा कोरोनाचा बळी आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी एकूण ६६ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ६ पॉझिटिव्ह आले आहेत. सहापैकी ५ रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास असून, औशाचा एक रुग्ण सोलापूर येथून आला आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख १४२ वर पोहोचला आहे.