लातूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स प्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता कार्यालयात सोशल डिस्टन्स प्रमाणेच बैठक व्यवस्था केली आहे. प्रत्येकांच्या खुर्चीमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, लातूर तहसील कार्यालय आदी कार्यालयांत अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वीच कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्के केली असून त्यात ही उपाययोजना केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इकडे सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेने भाजी विक्रेत्यांची बसण्याचे ठिकाण निश्चित करून दिली आहेत. प्रत्येक विक्रेत्यांच्या मधील अंतर तीन फूट पेक्षा अधिक करण्यात आले आहे. जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येईल, या अनुषंगाने हे नियोजन करण्यात आले आहे.