लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, सोमवारी प्रलंबित असलेल्या १९ व्यक्तींच्या स्वॅबपैकी १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ३ निगेटिव्ह आहेत. ५ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले असून, एका व्यक्तीचा स्वॅब रद्द करण्यात आला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील १९ अहवाल प्रलंबित होते. त्यात लातूर तालुक्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उदगीर येथील ५ प्रलंबितपैकी २ पॉझिटिव्ह असून, ३ अहवाल प्रलंबित आहेत. निलंगा तालुक्यातून आलेले सहाही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण जिल्ह्यात १९ व्यक्तींच्या प्रलंबित अहवालांपैकी १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आलेख १०३ वर पोहोचला आहे. यातील ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता ५० रुग्ण लातूर, निलंगा आणि उदगीर येथे उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.