लातूर : लातूर जिल्ह्यात गुरुवारी एकूण १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील १३, अहमदपूर ३ व उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, ६ वर्षांच्या एका मुलीनेही कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी लातूर जिल्ह्यात एकूण २८ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातूरच्या शासकीय रुग्णालयातून सुटी झालेल्या १३ रुग्णांपैकी ९ रुग्णांमध्ये कोविड-१९ ची गंभीर लक्षणे होती. यातील एक रुग्ण सात दिवस व्हेंटिलेटर सपोर्टरवर होता. त्यानेही कोरोनावर मात केली आहे. सुटी झालेल्या ६ रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन तर उर्वरित १२ रुग्णांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, त्यांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.