लातूर : जिल्ह्यातील एकूण ९१ स्वॅबची शनिवारी तपासणी झाली. त्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ८४ निगेटिव्ह तर ३ प्रलंबित आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. दरम्यान, उदगीरमध्ये कोविड रूग्णालयात दाखल झालेल्या एका अत्यवस्थ ७८ वर्षीय रूग्णाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची संख्या ३ झाली आहे.
मुंबईहून ६ वर्षीय लहान मुलीसह एक कुटुंब २२ मे रोजी लातुरात आले होते. मुलीला ताप व न्युमोनिया असल्याने त्याच दिवशी पहाटे ४ वाजता थेट शासकीय रूग्णालयात सदर कुटुंबिय दाखल झाले. मुलीला ताप असल्याने कोविड १९ चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, तिच्या निकटच्या संपर्कातील ५ जणांना शनिवारी रात्री उशीरा लातूरच्या एमआयडीसी हुडको भागातून आणून क्वारंटाईन केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले. इतर तीन बाधितांमध्ये एक जण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून, तो फुफ्फुसाच्या आजारासाठी लातूरच्या रूग्णालयात दाखल झाला आहे. दाखल होतानाच त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर अन्य दोन अनुक्रमे उदगीर व रेणापूर तालुक्यातील आहेत.