लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी तपासणीसाठी ५३४ स्वॅब आले होते. त्यातील ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सोमवारी दिली. दरम्यान, आणखीन तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ११५९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींची संख्या ५३ झाली आहे. आतापर्यंत ९८७७ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, उपचारानंतर ५८० जणांना सुटी देण्यात आली असून, सध्या अॅक्टिव्ह रुग्ण ५२६ आहेत. मयत झालेल्या तिघांपैकी दोघे उदगीर शहरातील आहेत. त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब असा त्रास होता. तर निलंगा शहरातील मयत हा ज्येष्ठ नागरिक होता. त्यांच्यावर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे म्हणाले.