लातूर : जिल्ह्यातील २३ स्वॅब सोमवारी तपासण्यात आले. त्यात परजिल्ह्यातून आलेल्या निलंगा येथील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित १७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, निलंगा येथे पॉझिटिव्ह आढळलेले ६ जण मुंबई येथून विनापरवाना टेम्पोने गावाकडे आलेले होते.
निलंगा तालुक्यातील कोराळी येथील ८ जण १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या गावी आले. दरम्यान, गावातील अँटी कोरोना फोर्स व प्रशासनाने त्यांना घरातच थांबून ठेवले. त्यानंतर दुसºया दिवशी त्या सर्वांनाच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्या सर्वांच्याच स्वॅबची तपासणी सोमवारी झाली, ज्यामध्ये ६ जण पॉझिटिव्ह तर दोघे जण निगेटिव्ह आले आहेत. तर ठाणे येथील रुग्णालयातून लातूरला आलेली ५० वर्षीय व्यक्ती बाधित निघाली. ज्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, त्यांच्या परिवारातील ५ जणांची तपासणी करण्यात आली असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत. तसेच शहरातील अन्य चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण लातूरमध्ये ९ अहवाल निगेटिव्ह, उदगीरमध्ये ३, निलंग्यात २, चाकूर येथील २ व अहमदपूरमधील १ असे एकूण १७ जण निगेटिव्ह असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.