लातूर : उदगीर शहरातील ७० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. मधुमेह व अन्य आजारांमुळे त्या महिलेला अत्यवस्थ वाटू लागल्याने २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी तिचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, शनिवारी सकाळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. पाठोपाठ दुपारपर्यंत व्हेंटिलेटरवर असलेल्या सदर महिलेचा मृत्यू झाला.
यापूर्वी परराज्यातील ८ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण गेल्या आठवड्यात कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. परंतु, उदगीरमध्ये कोरोनाबाधित वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. उदगीर शहरातील हा पहिलाच रूग्ण असून, सदर महिलेचा प्रवास इतिहास तपासला जात असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने सांगितले.
उदगीरचा चौबारा सीलसदर महिला वास्तव्याला असलेल्या किल्ला गल्लीतील चौबारा परिसर पोलिसांनी सील केला आहे. सदरील भागात सर्वांच्याच येण्याजाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्या महिलेचे कुटुंबीय व त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. कुटुंबातील ५ जणांना क्वारंटाईन केले आहे.
लागण पसरू नये यासाठी यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देशकोरोनाची लागण पसरणार नाही याची काळजी आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते म्हणाले, सदरील मृत्यू झालेल्या महिलेचा संदर्भ परराज्याशी आहे का, याचा तपास यंत्रणा घेत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही देशमुख म्हणाले़ दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही तातडीने आरोग्य यंत्रणांशी संवाद केला. मृत महिलेच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाईन करावे. तसेच लागण कशी झाली याचा सोर्स तातडीने कळला पाहिजे, असेही राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.
संसर्ग नेमका कसा झाला ?मृत्यू झालेली कोरोनाबाधित महिला आपल्या परिवारासह उदगीरमध्येच राहते़ सदरील महिलेला २३ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता शासकीय रूग्णालयात दाखल केले होते़ त्याच्या सुमारे तासभर आधी कोरोनाबाधित महिलेच्या शेजारी राहणारी ३५ वर्षीय महिलासुद्धा परराज्यातून घरी परतली होती. तिच्याशी मृत्यू झालेल्या महिलेचा संपर्क झाला होता किंवा नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने म्हणाले़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा मृत्यू झालेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून व कसा झाला, याचा शोध घेत आहे.