लातूर - खोकला व ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोना चाचणी करून घेतली. दरम्यान, बुधवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत. त्यानुसार खोकला व ताप आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना चाचणी करून घेतली. बुधवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असून काळजीचे कारण नाही.या संदर्भात पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले, आपल्याला ताप व खोकला आजाराची लक्षणे असताना इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी चाचणी करून घेतली. राज्य शासनाकडून कोविड-१९ संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे सर्वांनीच पालन तसेच हेल्पलाईनला संपर्क केला पाहिजे, असे ते म्हणाले.घाबरू नका, तपासणी करून घ्या...सर्दी, खोकला, ताप असेल तर घाबरून जाऊ नका. आपला आजार, लक्षणे लपवू नका. आपल्यामुळे आई, वडील, कुटुंब, शेजारी व समाजात संसर्ग होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे असे स्पष्ट करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, चार दिवस घरून काम करीन. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. दरम्यान, आ. धीरज देशमुख यांनी पालकमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून, काळजीचे कारण नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी म्हणून लक्षणे दिसल्यास तपासणी करून घेतली पाहिजे, असे सांगितले.