लातूर - जिल्ह्यातील एक आमदार, त्यांचा 20 वर्षीय मुलगा आणि भाचा अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती मंगळवारी रात्री उशिरा समजली. भाजपाचेआमदार लक्षणे जाणवू लागल्याने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी दाखल झाले. कोविड १९ ची चाचणी करून घेतली. दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदारांनी लातूरमध्येच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची प्रकृती उत्तम असून नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड रूग्णालयात ते दाखल आहेत. दिवसभरात कोरोनाचा संसर्ग झालेले ते भाजपाचे चौथे आमदार झाले आहेत.
दरम्यान, याआधी आज भाजपाच्या तीन आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. एकीकडे भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या लढ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी राज्यभर फिरत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार कोरोना बाधित होत आहेत. आज दिवसभरात तीन भाजपाच्या आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी दोन आमदार हे पुण्यातील आहेत. पुण्याच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना झाला आहे. टिळक यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
तर भाजपचेच पुणे जिल्ह्यातील दौ़डचे आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यामुळे पुण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाने विळखा घातला असून महापालिकेचे अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. पुण्यानंतर उल्हासनगरमध्ये भाजपाचे तिसरे आमदार कोरोना बाधित झाले आहेत. कुमार आयलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सत्ताधारी पक्षांतील दोन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते उपचारानंतर बरे झाले होते. आता विरोधी पक्षातल्या आमदारांना कोरोनाने गाठले आहे.