लातूर: जीवनावश्यक वस्तू शहरातील नागरिकांना घरपोच पोहोचण्याचा मनपाने पुढाकार घेतला आहे.
किराणा,भाजीपाला फळे,दूध ,बेकरी आदी खाण्याच्या वस्तूंची होम डिलिव्हरी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी काही विक्रेत्यांना विशेष परवानगी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे,अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लातूर शहरासह देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून काही विक्रेत्यांना ओळखपत्र देऊन विशेष परवानगी दिली जाणार आहे.
ग्राहकांनी फोनवर ऑर्डर दिल्यानंतर त्यांना हवे ते साहित्य घरपोच पोहोचविले जाणार आहे. या उपक्रमासाठी मनपाकडून विक्रेत्यांची यादी तयार केली जाणार आहे. यातील काही निवडक विक्रेत्यांना ओळखपत्र देऊन विशेष परवाना दिला जाणार आहे. जेणेकरून शहरातील नागरिकांची अडचण दूर होईल. शिवाय शहरातील विक्रेत्यांकडे होणारी गर्दी कमी होईल. नागरिकांनी कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी घराबाहेर पडू नये, शासकीय यंत्रणा तुमच्यासाठी काम करत आहे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.