लातूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला लातुरात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे़ रविवारी दुपारी १़३० वाजेपर्यंत शहरातील संपूर्ण रस्ते निर्मनुष्य आहेत़ सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या गंजगोलाई, मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट आहे़ एवढेच तर रिंगरोडवर वाहतूक बंद असल्याने पहिल्यांदाच लातूर शहराने एवढा मोकळा श्वास घेतला आहे़ याशिवाय, जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद असून ग्रामीण भागातही भरघोस प्रतिसाद आहे.
लातूर शहरात पहिल्यांदाच भल्या पहाटे दूध आणि वर्तमानपत्रही नागरिकांना रविवारी घरपोच मिळाले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांवर आरोग्य यंत्रणेसह आता जनताही सतर्क झाली आहे़ जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा, यासाठी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी सर्वांना आवाहन केले होते़ त्यानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले़ लातूर शहराची लोकसंख्या ५ लाखांवर असून जवळपास एक लाखांहून अधिक घरे आहेत़ कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूरकरांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला आहे़
सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आगारात लावण्यात आल्या आहेत़ एकही आॅटोरिक्षा रस्त्यावर धावला नाही़ हॉस्पिटल वगळता अन्य सर्व आस्थापना कडकडीत बंद आहेत़ दरम्यान, उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा, जळकोट, रेणापूर, चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ या शहरांमध्येही जनता कर्फ्युमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत़ अगदी ग्रामीण भागातही दिवसभर शुकशुकाट आहे़
बच्चे कंपनी गुंतली खेळात़रविवारी दिवसभर घराबाहेर निघायचे नसल्याने बच्चे कंपनी विविध खेळात गुंतली होती़ कॅरमबोर्ड, बुध्दीबळ, टी़व्ही़ पाहणे आदींसह गप्पागोष्टींमध्ये संपूर्ण कुटुंब रंगल्याचे चित्र घरोघरी पहावयास मिळत आहे़ रेल्वे स्थानक, बसस्थानक, शहर बस वाहतूक सेवा, आॅटोरिक्षा सर्व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे़