लातूर : जिल्ह्यातील दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८ वर गेला आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात ६ जून रोजी औसा तालुक्यातील येल्लोरी येथील एका ४२ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
तसेच बुधवारी दुपारी ७० वर्षीय रुग्णाला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी तीन दिवसांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा आजार होता. पाच वर्षांपूर्वी बायपास सर्जरीही झाली होती. गुरुवारी मध्यरात्री सदरील रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. राजेश बोबडे, डॉ. किरण डावळे, डॉ. राम मुंढे, डॉ. मारुती कराळे व औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
बाधितांची संख्या १७० वरलातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७० वर पोहोचली आहे. उपचारानंतर १२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.