लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोमवारी रात्री दोघा बाधितांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या २६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित ४९९ असून, त्यातील २७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २०२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील ६५ वर्षीय कोरोना बाधितावर ३ जुलैपासून उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा उदगीरच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असा आजार होता. त्याचबरोबर लातुरातील आनंद नगर येथील एका ४८ वर्षीय बाधितावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.