लातूर : उदगीर येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील चौघा जणांच्या स्वॅबची पुनर्तपासणी करण्यात आली. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक निगेटिव्ह आला असून, एका स्वॅबची पुनर्तपासणी होणार आहे. उदगीरमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर पोहोचली असून, आजपर्यंत २०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी एकूण १३ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यातीलच चार व्यक्तींचे स्वॅब ४८ तासानंतर पुनर्तपासणीसाठी घेण्यात आले होते. १२ पैकी ८ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुनर्तपासणीतील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह, तर एक निगेटिव्ह आणि एक पुन्हा पुनर्तपासणी होणार आहे.
उदगीर येथे आतापर्यंत २०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे उदगीरकरांनी घाबरू नये. बाधित क्षेत्रामध्ये ये-जा करू नये. प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे. सदरील लागण शहराच्या अन्य भागांत पसरलेली नाही, असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बाधितांवर उपचार करणाºया डॉक्टर व अन्य कर्मचाºयांचेही अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.