लातूर : पेरणीचे सुक्ष्म नियोजन व अचुक संकलन होण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषि मुल्य आयोगाने बैठका घेऊन राज्य शासनास सूचना केल्या होत्या. या सूचना राज्य शासनाने स्वीकारुन पीक पेऱ्याचे अचुक संकलन करण्यासाठी कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पेरणीचे अचुक नियोजन व पेरणी झाल्यानंतर पीकपेऱ्याचे संकलन करण्यासाठी जूनमध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. या बैठकानंतर राज्य शासनाला सूचना करण्यात आल्या होत्या. शासनाने त्या सूचनांचा स्वीकार केला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सूचनानंतर शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीची अचूक नोंद ही गाव नमुना व नमुना १२ वर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पेरणी केलेल्या पिकांचा प्रकार, आंतरपिकांची अचूक नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची राहणार देखरेख
कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी तलाठ्यांना मदत करावी, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र गट तयार करावा़ कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास कृषि विद्यापीठाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, असे सुचविण्यात आले आहे. हे काम आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करुन जमा केलेली माहिती गाव नमुना १२ मध्ये आॅनलाईन नोंद करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामावर देखरेख ठेऊन प्राप्त माहिती मंडळ, तालुका व जिल्हा स्तरावर पीकनिहाय विविध खात्यांना द्यावी असेही स्पष्ट करण्यात आले असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले़
खात्रीशीर माहिती मिळणाऱ़़राज्य कृषि मुल्य आयोगाने पुढाकार घेऊन केलेली सुचना राज्य शासनाने स्वीकारल्यामुळे आता प्रत्येक पिकाची पेरणी किती प्रमाणात झाली, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे, असेही पाशा पटेल यांनी सांगितले़