- बालाजी थेटे
औराद शाहजनी (जि. लातुर) : निसर्ग कोपल्यास सारे हतबल होऊन पाहत राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, मेहनतीने पिकवलेले पिक पुरात वाहून जात असताना काहीच न करता केवळ पाहत राहणे कुठल्याच शेतकऱ्याला पटणारे नाही. लातूर जिल्ह्यातील चांदुरी ( ता. निलंगा ) गावात पुरात वाहून जाणारी सोयाबीन गंजी शेतकऱ्याने हिम्मत दाखवत खेचून सुरक्षित स्थळी आणली. कधीही हार न मानणारा बळीराजाचा बाणा दाखवणाऱ्या या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निलंगा तालुक्यात मंगळवारी राञी जोरदार पाऊस झाला यात औराद परीसरातील औराद, चांदोरी, बारसुरी, तगरखेडा, सावरी, सोनखेड, हालसी आदी गावातील शेतशिवारात नदया, ओढयाचे पाणी घुसले त्यामुळे शेतांना नद्याचे स्वरुप आले. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी करुन गंजी लावुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात वाहुन गेले.
हिमंतीवर वाचवले वाहून जाणारे सोयाबीन यामध्ये चांदोरी येथिल दत्ता व्यंकट गाडीकर यांचे दोन एकरवरील काबाड कष्ठ करुन पिकविलेली यावर्षीची पुंजी सोयाबिन मध्ये गुंतवुन ठेवलेली सकाळी डोळया देखत वाहात जात आसल्याचे पहाताच सोबत भाऊ व शेजारी यांना घेऊन त्याने वाहात्या पाण्यात हिंमत करत आपला पोटच्या गोळ्यासारखी जपलेली सोयाबिन बनिम त्याने दोरी ,कपडा सहाय्याने पाण्यातुन ओढत बाहेर काढली. यातील निम्मी बनिम वाहून गेली पण निम्मी बनिम वाचवल्याचा आनंद दत्ताच्या चेहऱ्यावर होता. यासह अनेक शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.