लातूर : चाेरट्या मार्गाने विनापरवाना वाळूची वाहतूक करत तस्करी करणारा ट्रॅक्टर वाहन पाेलिसांनी छापा मारून पकडला असून, यावेळी वाळूसह ट्रॅक्टर असा एकूण ८ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी चाकूर तालुक्यातील मुरंबी ते महाळंग्रा राेडवर करण्यात आली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात एकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील पाेलिस निरीक्षक बालाजी महादू माेहिते यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मनाेज निवृत्ती क्षीरसागर (वय ४१ रा. महाळंग्रा, ता. चाकूर) हा ट्रॅक्टरमधून (एमएच २४ बीएल ३३७९) शासनाची कुठलीही परवानगी न घेता, चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करत हाेते. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकूर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी ताब्यात घेतलेल्या वाहनातून काेठून तरी चाेरून वाळूची वाहतूक करत असताना आढळून आले. यावेळी झाडाझडती घेतली असता, वाहनासह दीड ब्रास वाळू असा एकूण ८ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे