निलंगा : लातूर ते जहीराबाद हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, पानचिंचोली ते औराद शहाजनी मार्गावर भेगा व खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ताजपूर-मुगाव येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या. मार्गावर भेगा, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळंके यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. पानचिंचोली ते मुगाव भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील पृष्ठभागही खराब झाल्याने खड्डे पडले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारा असल्यामुळे महाराष्ट्राच्या हद्दीतून हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. मसलगा येथील पुलाच्या बाजूचा रस्ता खराब झाला आहे. शिवाय औराद शहाजानी येथील पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून रखडले असल्याने येथे अनेक अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
निष्कृष्ट कामाची चौकशी करावी...या रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळूंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शहराध्यक्ष अजित नायकवाडे, सर्कलप्रमुख गंगाधर चव्हाण यासह कार्यकर्त्यांनी केली. शिवाय ताजपूर येथे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.