लातूर : केवळ भौतिक साधनसामुग्री म्हणजे राष्ट्राचा विकास नाही. बुलेट ट्रेन ही काळाची गरज असली, तरी भूक, भ्रष्टाचार, नशा आणि हिंसा संपविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. चारित्र्य आणि शारीरिक विकासावरच राष्ट्राची उभारणी होईल, असे मत राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी येथे व्यक्त केले.विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने १९ वा राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात सुरू आहे. याप्रसंगी ते लोकमतशी बोलत होते. देशातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती, राहणीमानातील विविधता आणि विधितेतून राष्ट्राची एकता हा या बालमहोत्सवाचा उद्देश आहे असे सांगत डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले, केवळ बोलून एकतेचा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी कृती करावी लागणार आहे.यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले. देशातल्या विविधेतून एकता साध्य करायची असेल तर सरकारच्या प्रतिनिधींनी लातुरातील हा बालमहोत्सव पाहिला पाहिजे. केरळ राज्यामध्ये श्रम करताना दिल्लीतील शास्त्री भवनातून टेलिफोन आला, मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले की तुमचे नाव पद्म अॅवॉर्डसाठी घेण्यात आले आहे. त्यावेळी मी त्यांना पद्म अॅवॉर्ड नको असे सांगितले.त्यानंतर तामिळनाडूचे मंत्री एम.जी. रामचंद्रजी यांचे नाव पुरस्कारासाठी पुढे आले. सिनेमावाल्यांना असे अॅवॉर्ड दिले जात असेल तर त्यांच्या रांगेत मला थांबायचे नाही असे ठणकावून सांगितले. हे बालक माझे पद्म अॅवॉर्डच आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्रव्यवहार केला, त्यावेळी मंत्री महावीर त्यागी आणि डॉ.व्ही.के.आरव्ही राव यांनी एनएसएस व एनसीसीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आणि पहिला महोत्सव सेवाग्राम येथे झाला. एनएसएसमध्ये सक्तीची सेवा नाही तिथे स्वयंअनुशासन आहे. तर एनसीसीमध्ये सक्तीने अनुशासन केले जाते आणि आमच्या बाल महोत्सवातही स्वयंअनुशासन आहे. विविधतेतून एकता साध्य करण्याचा बाल महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. एकतेची शिस्त या बाल महोत्सवात मिळते, असेही सुब्बाराव म्हणाले.जय जगत् पुकारे जा..सुब्बाराव म्हणाले, भारतासह जगातील २५ देशांमध्ये भ्रमण केले. यूनोमध्ये शांतता या विषयावर व्याख्यान दिले. सहभागी झालेल्या जगभरातील १४०० तज्ज्ञांनी पुस्तकी ज्ञानावर भर दिला. पण आम्ही प्रत्यक्ष कृतीतील अनुभवावर तिथे व्याख्यान दिले आणि ते यूनोमधील सहभागी तज्ज्ञांना आवडले. याच कार्यक्रमात जय जगत्, जय जगत्.. पुकारे जा.. सिर अमन पे वारे जा.. सबके हितके वास्ते, अपने सूख बिसारे जा...ह्ण, ह्यप्रेम की पुकार हो, सबका सबसे प्यार हो.. जीत हो जहानकी, क्यों किसीकी हार हो.. हा विश्वव्यापी विचार दिला आणि तो जगाला भावला, असेही डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले.
चारित्र्यसंपन्न पिढीकडून राष्ट्राची उभारणी, डॉ. एस. एन. सुब्बाराव यांची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:43 PM