लातूर : ध्येयवादी युवक-युवतीच आत्मनिर्भर समाज उभारतील. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन सज्जनांचा समूह मजबूत केला पाहिजे. ज्यामुळे त्यांच्याकडून कार्यसंस्कृती निर्माण होईल आणि समाजोन्नती साधली पाईल, असा विश्वास प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी एम. डी. प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात व्यक्त केला. ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांचा प्रातिनिधिक सत्कार आणि व्याख्यानाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. उदय देशपांडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. लहाने म्हणाले, दूरदृष्टीचे ध्येय बाळगले पाहिजे. सज्जनांचा गट तयार केला पाहिजे. तरुणांनी उद्दिष्ट साध्य करताना प्लॅन ए व बी तयार ठेवून सकारात्मकपणे पुढे गेले पाहिजे. एकदा गोष्ट ठरवली की ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. मला अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून प्रेरणा मिळाली. तेव्हापासून दरवर्षी ६०० ते ८०० दुभंगलेले ओठ व टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया होऊ शकल्या. हे टीमचे फलित आहे. कोणतेही काम एका व्यक्तीच्या हातून होत नाही, त्यासाठी सामूहिक योगदानाची गरज असते. ध्येय, नियोजन आणि त्यादृष्टीने प्रयत्न ही त्रिसुत्री आहे. प्रारंभी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला की कृषी क्षेत्र बळकट होईल आणि त्यामुळे देश आत्मनिर्भर होईल. त्यासाठी वीज, पाणी आणि शेतरस्ते याच कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रा. शिवराज मोटेगावकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उदय देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार संजय जेवरीकर यांनी केले.
डॉक्टरांचा सत्कार
यावेळी डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. विश्रांत भारती, डॉ. राहुल सूळ, डॉ. व्यंकटेश मलगे, डॉ. अभिषेक सानप, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. नेहा हिरेमठ, डॉ. अरुणाचलेश्वर बालकुंदे यांचा डॉक्टर्स डेनिमित्त सत्कार करण्यात आला.
एकट्याने यश मिळत नाही...
अपयश ही एक संधी असते. त्यावर मात करून यशासाठी पुढे गेले पाहिजे. शेवटी समाज पुढे जाण्यासाठी केवळ एकाने काम करून चालणार नाही, तर काम करणाऱ्यांचा समूह बनला पाहिजे. ज्यामुळे कार्यसंस्कृती निर्माण होईल, असेही डॉ. लहाने म्हणाले.