राजकुमार जाेंधळे, लातूर: एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच मुळ देगलूर (जि. नांदेड) व दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीटच्या निकालानंतर देशभर गोंधळाचे वातावरण असून, बिहार, पंजाब, गुजरात व हरियाणा राज्यातील पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. दरम्यान, शनिवारी दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले. मात्र तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईलवरती हॉलतिकिट व काही आर्थिक व्यवहारांचे संदर्भ आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे दोन्ही शिक्षक तसेच नांदेड व दिल्ली येथील आणखी दोघे, अशा चौघांविरूद्ध रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.
पेपर लिक नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल...
पेपरफुटीच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाचे पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (वय ४०, रा. लातूर), जलीलखाॅ उमरखान पठाण (वय ३४, रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी काेनगलवार (मुळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चाैघांविराेधात केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
प्रश्न विचारले सोडून दिले...
ज्या दोन शिक्षकांवर आरोप आहे त्यातील एकाने व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले. पथक आमच्याकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन आमची चौकशी केली. काही प्रश्न विचारले. त्यानंतर आम्हाला घरी सोडून दिले, असल्याचे सांगितले. दरम्यान, रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे तपासात पुढे येणार आहेत.
२३ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला...
देशभरात २३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. निकाल लागूनही विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आनंद साजरा करता आला नाही. त्यातच पेपरफुटीच्या तपासात नवनवीन खुलासे होत असल्याने विद्यार्थी, पालकांत संभ्रम आहे.
फिर्यादीत काय म्हटले आहे..?
संजय तुकाराम जाधव, जलिलखाॅ उमरखान पठाण हे दाेघे पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवित असल्याची माहिती पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांना कळली. त्यावरुन एटीएसचे प्रभारी पाेलिस निरीक्षक सुनील नाईक हे पथकासह शनिवारी लातुरात दाखल झाले. त्यांनी गाेपनीय माहितीची शहानिशा केली. त्यानंतर प्राथमिक चाैकशीसाठी दाेघे शिक्षक स्वइच्छेने हजर झाले. त्याच्या माेबाईलवरील माहिती, फाेन गॅलरीमधील परिक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र, व्हाॅटस्अप चॅटिंगबाबत समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत. त्यामध्ये जलिलखाॅ पठाण याने संजय जाधव यास प्रवेश पत्राच्या प्रति आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात लघुसंदेश पाठविल्याचे दिसून आले. तसेच जाधव याने अन्य एक संशयीत ईरन्ना मष्णाजी काेनगलवार यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हाॅटस्अपद्वारे पाठविले. पुढे ईरन्ना काेनगलवार याने दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीला संपर्क केला. जाे पैशाच्या माेबदल्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार करीत असल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.