जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बायोडिझेल व अवैधरीत्या डिझेल विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी तालुक्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या पथकात तहसीलदारांना सहायक म्हणून नायब तहसीलदार जी. आर. पेद्देवाड, बी. जी. मिट्टेवाड, इंधन विक्री करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक पंकज यादव हे आहेत. या पथकासह अनिल धापोडकर, कल्पेश मोर्या, पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव, तलाठी माधव जोशी, कोतवाल गुंडेवाड यांनी २४ ऑगस्ट रोजी दुपारी बायोडिझेल, अवैधरीत्या डिझेल विक्री होत आहे का, याची पाहणी करीत होते. तेव्हा अहमदपूर ते शिरूर ताजबंद रस्त्यावर एमएच २६, बी ७५६८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून चालक डिझेल सदृश इंधन विक्री करीत होता. तेव्हा पथकाने धाड टाकली असता तो पसार झाला. पथकाने वाहनाच्या टाकीतील ४०० लिटर डिझेल सदृश इंधन जप्त केले. याप्रकरणी नायब तहसीलदार जी. आर. पेद्देवाड यांच्या फिर्यादीवरून सदरील वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक एन.व्ही. लाकाळ करीत आहेत.
अवैधरीत्या इंधन विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:24 AM