- राजकुमार जोंधळे
लातूर - शहरातील सैनिक कॉलनी येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील सैनिक कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेले पद्माकर नारायणराव कुलकर्णी आणि व्यापारी शामसुंदर पांडुरंग मलावाडे यांची घरे आहेत. दोन दिवसांपूर्वी पद्माकर कुलकर्णी हे कौटूंबिक कार्यक्रमानिमित्त गुरुवारी घराला कुलुप लाऊन बाहेर गेले होते. शनिवारी घरी परत आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. घरात जाऊन पहाणी केली असता चोरट्यांनी घरातील रोख रक्कम ३२ हजार ५०० रुपये व सोन्याच्या आंगठ्या, सोन्याचे गंठण, सोन्याचे झुमके, सोन्याच्या पाटल्या असा १० तोळ्यांचा ऐवज (किंमत ३ लाख २ हजार ९९५ रुपये) चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या शेजारीच वास्तव्यास असलेल्या शामसुंदर पाडुंरग मलवाडे यांचेही घर फोडले. मलवाडे हे दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे बुधवारी हम्पी कर्नाटक येथे सहकुटूंब फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी ते घरी परत आले असता त्यांना घराच्या चॅनल गेटचे कुलुप तोडलेले आढळून आले. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेला सोन्याचा हार, कानातील सोन्याचे झुंबर, सोन्याचे मिनी गंठण, सोन्याचे कंगण, सोन्याचे बाजुबंद, सोन्याची नाकातील नथ असा २६ तोळ्यांचे दागिने चोरुन नेले. तसेच घरातील १३ हजार रुपयांचे रोख रक्कम, एक मोबाईल आणि सिसिटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत शामसुंदर मलवाडे यांनी दिलेल्या तक्रारिवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुरनं ४३८/२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.