लातूर : शहरातील लातूर-बार्शी महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या परिसरात असलेल्या किराणा मालाचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी फोडून १६ लाखांची रोकड असलेली तिजोरीच पळवली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वीही हे गोदाम फोडल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर-बार्शी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची, नगारिकांची वर्दळ असते. या महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाच ते सहा फुट उंचीचे बांधकाम करुन त्यावर पत्र्याचे गोदाम उभारण्यात आले आहे. हे गोदाम एका कंपनीने भाडेतत्वावर घेतले आहे. या गोदामातून किराणा मालाचा पुरवठा केला जात होता. दरम्यान, रात्री अज्ञात चोरट्यांनी गोदामाचा पाठिमागील पत्रा कापून आत प्रवेश केला. गोदामामध्ये १६ लाखांची रोकड ठेवण्यात आलेली तिजोरीच चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पळविली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पाहणी केली. घटनास्थळी तातडीने श्वानपथक तैनात करण्यात आले. या घटनेचा तपास विविध पोलीस पथकांकडून केला जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डी.व्ही. गीते यांनी दिली.
वॉचमन, सीसीटीव्हीचा अभाव...
लातूर-बार्शी महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गाेदामामध्ये लाखो रुपयांचा किराणा माल असतो. मात्र, गोदामाच्या सुरक्षेसाठी ना वॉचमन नियुक्त केला आहे. ना सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. केवळ वॉचमन आणि सीसीटीव्ही नसल्याच्या कारणाने चोरट्यांनी पाठीमागील पत्रा कापून १६ लाखांची रोकड असलेली तिजोरीच पळविली आहे. गत काही दिवसांपासून लातूरसह जिल्हाभरात घरफोडी,चोरीच्या घटनात वाढ झाली आहे.