लातूर : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून खून करणाऱ्या पतीला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरोपी गुनील उर्फ गुणवंत बापूराव गायकवाड (रा. डोंग्रज ता. चाकूर, ह.मु. वसवाडी, लातूर) हा आपली पत्नी सोनालीसोबत वास्तव्याला होता. १६ जानेवारी २०२१ रोजी त्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान सोनाली गुनील गायकवाड ही झोपी गेली असता धारदार कोयत्याने गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर गांधी चौक पोलिस ठाण्यात आरोपी स्वत: हजर राहून पत्नीला कोयत्याने मी मारून टाकले आहे, असे सांगितले. त्यानुसार गांधी चौक पोलिस ठाण्याने एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सपोनि.
प्रशांत पोतदार यांना गांधी चौक पोलिस ठाण्यात भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोतदार यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतले. शिवाय, घटनास्थळी भेट दिली असता पत्नी सोनाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यानुसार फिर्यादी प्रशांत पोतदार यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला.
टॉवर लोकेशन, सबळ पुराव्याद्वारे गुन्हा सिद्ध...पोलिसांनी तपास करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात एकूण १३ जणांची साक्ष झाली. मोबाइल टॉवर लोकेशन, जप्त केलेला कोयता, पोलिसांनी केलेला तपास आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी दोषी ठरला. कलम ३०२ अन्वये नुसार जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
पोलिस ठाण्यात हजर हाेत आरोपीची कबुली...गांधी चौक पोलिस ठाण्यात स्वत: हजर होऊन आरोपीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर सुनावणी झाली. यामध्ये सादर करण्यात आलेले सबळ पुरावे महत्वपूर्ण ठरले. या खटल्यात सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. परमेश्वर तल्लेवाड, पोउपनि. एच.एम. चौंडीकर यांनी सहकार्य केले. तपास पोनि. संजीवन मिरकले यांनी केला.