लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या टाेळीतील अट्टल तिघांविरोधात लातूर जिल्ह्यात एकूण सहा पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याची माहिती आता चाैकशीत समाेर आली आहे. भडी येथील पाच लाखांच्या घरफोडीत अटक केलेल्या तिघांच्या चाैकशीत अन्य गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील भडी येथील गाेपाळ किशन मद्दे यांचे घर १ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास फाेडून चाेरट्यांनी तब्बल ४ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, या घरफाेडीच्या तपासामध्ये असलेल्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे शिवमणी संताेष भाेसले (वय २१, रा. जनवाडी, ता. भालकी, जि. बिदर, ह. मु. तरकारी बाजार, निलंगा), अजय व्यंकट शिंदे (वय २१, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर) आणि विजय बब्रू भाेसले (वय २१, रा. घाटशील राेड, तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या तिघांच्या माेठ्या शिताफीने पकडण्यात पथकाला यश आले. त्यांच्याकडून साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम, असा एकूण १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांची अधिक चाैकशी केली असता, विविध पाेलिस ठाण्यांत त्यांच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समाेर आले आहे.
या ठाण्यातून मिळाली कुंडली...लातूर शहरातील लातूर ग्रामीण, एमआयडीसी, गांधी चाैक, शिवाजीनगर, शिरूर अनंतपाळ आणि चाकूर पाेलिस ठाण्यांमध्ये या अट्टल घरफोड्यांची कुंडली पाेलिसांच्या हाती लागली आहे. या पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये या टोळीने रात्रीच्या वेळीच घरफोड्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळीच घरफोडी करण्यासाठी टाेळी प्रसिद्ध असल्याचे पोलिस निरीक्षक गणेश कदम म्हणाले.