लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालत घरफाेड्या, चाेऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. त्याच्याकडून चाेरीतील दाेन दुचाकी, साेन्या-चांदीचे दागिने असा जवळपास २ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर जिल्ह्यात चोरी आणि घरफाेडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आदेश दिले हाेते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने गुन्हेगारांचा माग काढला. माहिती गाेळा केली. २१ सप्टेंबर राेजी संध्याकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारावर रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार राम दगडू गरगेवाड याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, अधिक चौकशी केली असता त्याने किनगाव ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून सोन्याचे दागिने पळविल्याचे कबूल केले. लातुरातील गांधी चाैक आणि शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन दुचाकी चाेरल्याचे सांगितले. त्या जप्त केल्या असून, त्याच्याकडून २ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राम दगडू गरगेवाड हा सराईत असून, लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक, एमआयडीसी, किल्लारी, उदगीर ग्रामीण, जळकोट, अहमदपूर ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत तो पसार झाला हाेता. त्याने आपला साथीदार आकाश ऊर्फ भावड्या बाबूराव कांबळे मिळून घरफाेडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजीव भोसले, राम गवारे, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, सिद्धेश्वर जाधव, बंटी गायकवाड, मोहन सुरवसे, नुकूल पाटील यांच्या पथकाने केली.