बोरगाव काळे : लातूर तालुक्यातील बोरगाव काळे, मुरुड महसूल मंडल व परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या ऊभ्या असलेल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी मृग नक्षत्रापूर्वी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. पाऊसही समाधानकारक पडत राहिल्याने पीक चांगल्या अवस्थेत आले असतानाच मध्यंतरी तीन ते चार आठवडे पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन पीक उत्पादनात निम्म्याहून अधिक प्रमाणात घाट झाली. या परिसरातील कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तर बागायतदार शेतकरी ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात. सोयाबीन पीक आता काढणीस आले आहे, तर काही शेतकरी त्याची काढणी करत असतानाच गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी पावसाने झोडपून काढल्याने जे पिकलं होतं, त्याची पुन्हा एकदा माती होते की काय, हातातोंडाशी आलेले पीक पदरात पडतंय की नाही, या विचाराने बळीराजा हवालदिल झाला आहे. गुरूवारपासून सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
फोटो कॅप्शन : लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव येथील कॅनॉलचे पाणी शेतात शिरल्याने टाकळगाव येथील शेतकरी चंद्रकांत जाधव यांचे सोयाबीन, उद्धवराव कदम, सीताराम कदम, उत्तम कदम यांचा ऊस पाण्यात गेल्याने नुकसान झाले आहे.