लातूर : दीपावलीपूर्वी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, पीकविमा कंपनी आता ३२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. ११ मंडळांना अग्रीम देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी प्रशासनास जुमानत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
खरिपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारकांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतल्याने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची बैठक झाली.
बैठकीत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना अग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले, तर उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. आता पीकविमा कंपनीने ४३ पैकी केवळ ३२ मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा करण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित ११ मंडळांना आगाऊ रकमेसाठी टाळाटाळ सुरू केली आहे.
२ लाख १९ हजार शेतकऱ्यांना भरपाई...पीकविमा कंपनीने ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २१५ कोटी जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यात तांदुळजा, हरंगुळ बु., कन्हेरी, मुरूड, गातेगाव, कासारखेडा, चिंचोली ब., बाभळगाव, लातूर, भुतमुगळी, मदनसुरी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, निलंगा, निटूर, हिसामाबाद, बेलकुंड, किनीथोट, उजनी, औसा, भादा, लामजना, तोंडार, उदगीर, झरी, चाकूर, आष्टा, वडवळ ना., नळेगाव, शेळगाव, कारेपूर, घोणसी मंडळाचा समावेश आहे.
ही अकरा मंडळे वंचित...कासार शिरसी, औराद शहाजानी, साकोळ, किल्लारी, नागलगाव, नळगीर, रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, जळकोट आणि शिरूर ताजबंद ही अकरा महसूल मंडळे अग्रीमपासून वंचित राहत आहेत.
काहींना दिलासा, तर काहींना प्रतीक्षा...जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे अग्रीम कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रभारी कारभारामुळे उदासीनता...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कारभार हा प्रभारींवरच सुरू आहे. त्यामुळे उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. नियमित अधिकारी येतील आणि हा तिढा सोडवतील अशी प्रभारींची मानसिकता असल्याची चर्चा होत आहे. त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होत आहे. हे प्रभारी कोणाचे 'लाडके'? असा सवाल उपस्थित होत आहे.