लातूर : कातपूर राेडवरील एका बंगल्यावर १२ ऑक्टाेबर राेजी पहाटे आठ ते दहा जणांच्या टाेळीने सशस्त्र दराेडा टाकत २ काेटी २५ लाखांची राेकड आणि ७३ लाखांच्या साेन्याचे दागिने असा तीन काेटींचा मुद्देमाल पळविला हाेता. दरम्यान, या दराेड्याचा प्लॅन सहा महिन्यांपूर्वीपासूनच झाल्याचे समाेर आले आहे. दराेड्यात प्रामुख्याने दाेन टाेळ्यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले. अटकेतील चाैघांकडून गुन्ह्याची उकल झाली.
उद्याेजक राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर सुरुवातीला एका आरोपीची नजर पडली. काेट्यवधींची राेकड आणि काही किलाे साेने घरात असल्याचा त्याचा अंदाज हाेता. हा मुद्देमाल लुटण्याची याेजना ताे गेल्या वर्षभरापासून आखत हाेता. त्याने रेणापूर तालुक्यातील बावची येथील एकाशी चर्चा केली. दरम्यान, या दाेघांनी पुण्यातील एकाशी संपर्क साधला. त्याने मुंबईतील एकाला आणि जालन्यातील एका अट्टल साथीदाराला साेबत घेण्याचे ठरवले. आठ ते दहा जणांच्या टाेळींचा बंगल्यावर दराेडा टाकण्याचा कट शिजला. ११ ऑक्टाेबरच्या रात्री ही टाेळी लातुरात दाखल झाली.
लातुरातील आराेपीने केली व्यवस्था...बाभळगाव राेड परिसरात राहणाऱ्या किशाेर नाराणय घनगाव (३७) याच्या खाेलीवर ही टाेळी दाखल झाली. त्यांनी हाॅटेलवरून सायंकाळी पार्सल मागवून जेवण केले. त्यानंतर रात्री कशा पद्धतीने दराेडा टाकायचा, याबाबत अंतिम रचना केली. १२ ऑक्टाेबरच्या पहाटे घराच्या पाठीमागून चार ते पाच जण बंगल्यात घुसले. त्यांनी घरातील लाेकांना झाेपेतून उठविले. पिस्टल, चाकू आणि कत्तीचा धाक दाखवत राेकड आणि साेने दाेन ट्राॅलीमध्ये काेंबून ते पसार झाले.
वाटाघाटीतून फुटले गुन्ह्याचे बिंग...अग्रवाल यांच्या बंगल्याची ज्याने टीप दिली, त्या किशाेर घनगाव याच्या हातावर केवळ अडीच ते तीन लाख रुपये टेकविले. मात्र, ज्याने दराेडेखाेरांची ओळख करून दिली त्या गणेश काेंडिबा अहिरे याला मात्र काही देण्यात आले नाही. गणेश आणि किशाेर हे दाेघे मित्र दारू ढाेसत बसले हाेते. तुला पैस मिळाले आणि मला काहीच मिळाले नाही, असे म्हणत या दाेघांनी रस्त्यावरच दारूच्या नशेत भांडण सुरू केले. हे दाेघे सतत भांडणात लाखाे रुपयांचा उल्लेख करत हाेते. शेजारी थांबलेल्या एकाने ही माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांचा संशयही अधिक बळावला अन् किशाेर घनगाव याला ताब्यात घेत चाैकशी केली असता, गुन्ह्याचा उलगडा झाला.